या क्रमांकावरून सुरू होणारे कॉल घेऊ नका: सरकारचा इशारा!

मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून मोबाईल जणू मुलभूत गरज बनला आहे. मात्र याचे तोटे देखील तेवढेच आहेत. मोबाईलमुळे सायबर क्राईम देखील वाढत आहेत. दुरसंचार विभागाने मोबाईल वापरकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे.WhatsApp वर +92 सारख्या परदेशी मूळ क्रमांकावरुन कॉल येत असतील तर सावधानतेचा इशारा दिला आहे. या नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे हे कॉल उचलू नका, असे दुरसंचार विभागाने म्हटले आहे.

+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका, असे दुरसंचार विभागाने म्हटले आहे.दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत की त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे.

सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी या कॉलद्वारे लोकांना धमकावून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे कॉल आल्यास कुठलीही माहिती देऊ नका. सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे.