राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मान्सूनने राज्यातून जवळपास एक्झिट घेतली आहे. तरीदेखील अनेक भागात अजून पावसासाठी पोषक असं वातावरण दिसून येत आहे. एकीकडे ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना बसत आहेत. तर दुसरीकडे काही भागात पावसाचं सावट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज, कोकणातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला

राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ३५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम

पूर्वोत्तर भारतातील राज्ये आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता मान्सूनने देशातून माघार घेतली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे.आज पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

जम्मू, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे, ज्याचा परिणाम सोमवार आणि मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये दिसून येईल.

या पावसामुळे येत्या पाच दिवसांत किमान तापमानात एक ते तीन अंश सेल्सिअसची घसरण दिसून येईल. दक्षिण तामिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व बिहार ते दक्षिण बांग्लादेशपर्यंत हवेचा कमा दाबाचा पट्टा तयार झाला आहे.