पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्यात येणार

इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाकडील शाळांमधील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. १६ जुन रोजी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करुन ८ हजार ३४ विद्याथ्यांना वह्या, पाठ्यपुस्तकासह आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळेत आवश्यक सुविधा देऊन शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती, आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्या म्हणाल्या, इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या ३३ प्राथमिक आणि राजर्षी शाहु हायस्कुल अशा एकुण ३४ शाळा आहेत. त्यापैकी प्राथमिक शाळांत ७ हजार २३४ तर शाहू हायस्कुलमध्ये ८०० असे एकुण ८ हजार ३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावर्षी सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २ गणवेश, वह्या, पुस्तक, बॅग, कंपास यासह विविध आवश्यक १९ साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार १६ जुन रोजी शहरातील सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून हे साहित्य देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांस किमान ८ हजार रुपयांचे हे साहित्य पहिल्याच दिवशी मिळणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची मदत आहे. त्यासाठी होणार महानगरपालिकने ८० लाख रुपये खर्च केला असन काही पाठ्यपुस्तके शासनाकडून मिळाली आहेत. याचबरोबर शाळेत विद्यार्थ्यांना चांगले वातावरण निर्मीतीसाठी आवश्यक सुविधा देऊन गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठीही प्रयत्नशिल असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. यावेळी इरफान पटेल, घोडके उपस्थित होते.