राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीच्या माध्यमातून भाजपचे निशिकांत पाटील, राहुल महाडीक, शिवसेना शिंदे गटाचे गौरव नायकवडी, आनंदराव पवार यांच्याकडून उमेदवारीची मागणी होत आहे. परंतू महायुती सर्व्हे करून मेरिटनुसार उमेदवारी देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आठव्यांदा विधानसभा लढवत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मताधिक्याचा आकडा वाढतच चालला आहे.
वाळवा तालुक्यात आ. जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरु आहे. परंतू आ. जयंत पाटील यांची राजकीय खेळी सर्वश्रुत आहे. त्यामुळे विरोधकांना अपयश येत आहे. आ. जयंत पाटील यांच्या एकूण विरोधी मतांची बेरीज पाहिल्यावर महायुतीतील नेत्यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांची एकी निवडणुकी अगोदर अभेद्य असते.
मात्र, निवडणुकीचे वातावरण तापायला लागल्यावर या एकजूटीला अचानक सुरुंग लागतो.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे मतदार संघात पक्ष संघटन घट्ट आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने विरोधकांनी एकजूट होऊन महायुती उमेदवाराच्या विजयासाठी एकसंघ होऊन प्रचार करणे गरजेचे आहे.