पंचगंगा नदीला पुन्हा रसायनमिश्रित पाणी; अधिकाऱ्यांना घेराव, हजारो मासे मृत

पंचगंगा नदीला पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट प्रदूषित पाणी आले आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत.या घटनेची प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी बुधवारी सायंकाळी(ता.११) पाहणी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी अधिकारी पाटील यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली.

आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी काहीही उत्तर न देता निघून जाणे पसंत केले. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका तसेच औद्योगिक वसाहती यांच्याकडून पंचगंगेत प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मासे मृत झाल्याचा आरोप बालिघाटे व पाटील यांनी यावेळी केला. तसेच इचलकरंजी महापालिकेवर कारवाईचा आग्रह धरला.प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंचगंगा नदीत प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत होण्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा रसायनमिश्रित काळेकुट्ट पाणी पंचगंगेत आल्याने हजारो लहान मोठे मासे तडफडून मृत्युमुखी पडले.

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा, केवळ पाण्याचे नमुने घेऊन जाऊ नका, तर त्याचा तपासणी अहवाल सार्वजनिक करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. वारंवार अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असून, याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मासेमारी करून उपजीविका करणाऱ्या कुरूंदवाड, तेरवाड, शिरढोण परिसरातील बागडी समाज बांधवांनी भाग घेतला.