सांगली लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केले जाणार, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.तसेच ५ एप्रिल रोजी ईव्हीएम मशीनचे सरमिसळ करण्यात येणार आहे.
डॉ. राजा दयानिधी म्हणाले, राज्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.मतदान करतानाचे चित्रीकरण होणार नाही
मतदार मतदान केंद्रावर आल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत होणाऱ्या सर्व घडामोडी यांचे चित्रीकरण होणार आहे.
मतदार मतदान करतानाचे चित्रीकरण केले जाणार नाही. मात्र मतदान यंत्राचा (ईव्हीएम) मतदान केल्यानंतरचा ‘बीप’ असा आवाज ध्वनिमुद्रित होणार आहे. यामुळे मतदान केंद्रावरील गडबडीला आळा बसणार आहे.
ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्यास किंवा कोणताही गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मिळू शकेल आणि हे प्रकार रोखले जातील.