चौरंगी लढतीमुळे वाढली रंगत……..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांसह, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मताची विभागणीत दोन्हीपैकी एकाच विजय होतो की या परिस्थितीचा फायदा मिळून खासदार धैर्यशील माने पुन्हा संसदेत पोहचतात याला महत्त्व आले आहे.वंचितचे डी. सी. पाटील यांच्या उमेदवारीमुळे कोण घायाळ होणार याचे कुतूहल असणार आहे.

हातकणंगले मध्ये उमेदवारी कोणाला मिळणार हे दिवसेंदिवस जटिल बनत चालले होते. अखेर काल उद्धव ठाकरे यांनी पक्ष चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला. आता ही लढत प्रामुख्याने चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यात रंगणार आहे. सर्व उमेदवार तुल्यबळ असल्याने मतदारांचाही गोंधळ उडवा अशी परिस्थिती आहे.