सूर्यकुमार यादवचे मुंबई इंडियन्सने केले खास स्वागत!

मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 च्या हंगामात चांगली सुरुवात झाली नाही. मुंबईचा सलग 3 सामन्यात पराभव झालेला आहे. या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. 

मुंबईचा आगामी सामना 7 एप्रिलला ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. याचदरम्यान मुंबईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्फोटक फलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी आज रवाना झाला आहे.

नुकतेच सूर्यकुमार यादवला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून मंजुरी मिळाली होती. सूर्यकुमार यादवने तंदुरुस्तीच्या चाचणीत जवळपास सर्व निकष पूर्ण केले आहेत.मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव अक्षय कुमारच्या रुपात दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी, चाहते व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादवला ‘अक्षय कुमार यादव’ म्हणताना दिसत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- समजले का? नाही, तुम्हाला समजले नाही… असो, मुंबई इंडियन्सची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत.