टेंभू सिंचन योजनेचे अखंडितपणे आवर्तन सुरू!

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी गेल्या सव्वातीन महिन्यांपासून टेंभू सिंचन योजनेचे अखंडितपणे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
लाभक्षेत्रातील ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

परिणामी ऐन दुष्काळात मोठा दिलासा मिळाल्याने टेंभूच्या आवर्तनाने शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळाले आहे.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई व पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी झाली. त्यानंतर २५ डिसेंबर २०२३ रोजी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी टेंभूचे आवर्तन सुरू करण्यात आले. तेव्हापासून हे आवर्तन तब्बल सव्वातीन महिने अखंडपणे सुरू आहे.

आता उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आवर्तन मेअखेर चालणार आहे. यंदाचा पावसाळा पूर्णपणे कोरडा गेल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. शासनाने दुष्काळी पट्ट्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व सिंचन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

टेंभू योजनेचे आवर्तन गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुरू असून टेंभूच्या पाण्याने कऱ्हाड तालुक्यातील ६००, कडेगावातील ९ हजार ९ हजार ३२५, खानापुरातील १८ हजार ९७५, तासगावातील ७ हजार ७००, तर आटपाडी, कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला असे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण ८० हजार ४७२ लाभक्षेत्रापैकी ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळातही येथे दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.