कोल्हापुरात प्रचाराने गती घेतली असताना हातकणंगलेतील हवा तापलेली नाही. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, निवेदिता माने यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. इचलकरंजी भाजप कार्यालयाला दोनवेळा भेट दिली असल्याने भाजपचे कार्यकर्ते प्रचारात दिसू लागले आहेत.
नाराजीची धग कमी करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. महायुतीचे मित्रपक्ष अजूनही रस्त्यावर नाहीत. मेळावे, सभा यापासून प्रचार दूरच आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली असल्याने मोठी यंत्रणा उभी करणे हे आव्हान असणार आहे. त्यांनी सभांचा धडाका उडवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उशिरा सुरु झालेला प्रचार आता कोठे गती घेत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना येथे महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे.
आघाडीची एकजूट ही जमेची बाजू. खासदार संजय राऊत यांनी भेट दिल्याने शिवसैनिक कार्यरत होताना दिसत असले तरी अजूनही आघाडीने जोर घेतलेला नाही. येत्या काही दिवसात चित्र बदलेले दिसेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.