शहापूर खाण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याची सूचना!

आगामी गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक साजरा होण्याच्या दृष्टीने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहापूर खाण येथे भेट देऊन पाहणी केली. यंदा गणेशमूर्ती विसर्जन अधिक सुलभरीत्या करता येईल, यासाठी खाणीमध्ये रॅम्प तयार करण्यासह गाळ काढण्याचे आदेश संबंधितांना दिले.

परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याची सूचनाही त्यांनी केली. महापालिकेतर्फे काही वर्षांपासून शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन कुंड ठेवले जातात.

शहापूर खाणीमध्येही घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासासाठी आवाहन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर या खाणीवर आवश्यक उपाययोजना आतापासूनच कराव्या लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर खाण परिसराला भेट देऊन पाहणी केली. स्वच्छता मोहीम वगळता अन्य सर्व कामे ७ मे नंतर सुरू करण्याच्या सूचना आयुक्त दिवटे यांनी दिल्या.

शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे आदी उपस्थित होते.