चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत आणि शियेपासून भुदरगडपर्यंत पसरलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि चांदोलीपासून वाळव्याच्या जुनेखेड तर, खिद्रापूरपासून शाहूवाडीच्या उदगिरीपर्यंत व्यापलेल्या ‘हातकणंगले’मतदारसंघातील गावापर्यंत प्रचारासाठी जाताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दमछाक उडत आहे.
प्रत्येक मतदारसंघात सुमारे २५० किलो मीटरच्या अंतरात १२०० गावांत पाेहचणे तेही कडक उन्हाळ्यात कठीण होणार आहे. शिराेळमधील खिद्रापूर ते शाहूवाडीतील उदगिरी, शिराळ्यातील चांदोली ते वाळवा तालुक्यातील जुनेखेडपर्यंत पसरलेला हातकणंगले मतदारसंघ हा सुमारे २५० किलो मीटर आहे. या क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. येथील मतदान ७ मे रोजी आहे, तोपर्यंत उन्हाचा तडाका वाढणार आहे.
अशा वातावरणात बाराशे गावांपर्यंत पोहचण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे. कोल्हापूर मतदारसंघात जवळपास ४ लाख ६४ हजार हे कोल्हापूर शहरातील तर हातकणंगले मतदारसंघात ३ लाख ५० हजार हे इचलकरंजी व ‘इस्लामपूर’ शहरातील मतदार आहेत. उर्वरित १४ ते १५ लाख मतदार हे ग्रामीण भागात असल्याने उमेदवार पुरते घामाघूम होणार आहेत.