गुडीपाडव्यासाठी खास बनवा खव्याची पोळी 

घटक

  1. २५ ग्रॅम खवा
  2. 1/4 कप व वर थोडी जास्त पिठीसाखर.कमी-जास्त करु शकता
  3. 1/4 टीस्पून वेलची पावडर
  4. 1-2 चिमूट जायफळ पावडर
  5. 1/2 कप मैदा
  6. चिमूटभर मीठ
  7. पाणी
  8. थोडेसे तेल

कुकिंग सूचना

एका बाऊलमध्ये मैदा व चिमुटभर मीठ घालून मिक्स करावे.थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. रोजच्या चपाती साठी मिळतो तशी कणीक मळून घेणे.तेल लावून ५ मिनिटे छान मळून घ्यावी.झाकून २० मिनिटे ठेवावी.**तुम्ही गव्हाचे पीठ वापरू शकता किंवा निम्मा मैदा व निम्मे गव्हाचे पीठ ही घेऊ शकतात.पण नुसत्या मैद्याच्याच पोळ्या छान खुसखुशीत होतात.

गॅसवर पॅन मध्यम आचेवर तापत ठेवावा. त्यात खवा घालून, मंद आचेवर सतत परतत राहा. खव्याचा रंग बदल थोडासा लालसर झाला कि गॅस बंद करावा. एका डिश मध्ये काढून थंड करून घ्यावा.

भाजलेला खवा थंड झाला की लगेच त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर व पिठीसाखर घालून व्यवस्थित मळून घ्यावे.

झाकून ठेवलेली कणीक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणे. एक बारका गोळा घेऊन पुरीच्या आकारात लाटून घेणे. त्यात खव्याचे मिश्रण थोडेसे घालून घेणे व उंडा करून घेणे. पुरणपोळीच्या जसा उंडा करतो, तसाच करून घेणे. अशाप्रकारे सर्व उंडे करून घेणे. म्हणजे पटापट पोळी लाटून,भाजताही येईल.

गॅसवर तवा तापत ठेवणे. तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूने छान भाजून घेणे.