सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे. सांगलीमधून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसकडून विशाल पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.यावरुनच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादही रंगला होता. अशातच आता विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकसंघ काम करतेय.काँग्रेस पक्षच सांगली लोकसभेची जागा लढवेल असा निर्णय घेतला होता. सर्वांचे एकमत होऊन माझे नाव दिल्लीला पाठवले होते.मात्र जागा वाटपाचा तिढा अनपेक्षित पणे आला. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतात. यात ते अपयशी ठरणार नाहीत, असे विशाल पाटील यावेळी म्हणाले.
आम्ही काँग्रेस नेत्यांनी कुठेही आक्रमक वक्तव्य केली नाहीत. संजय राऊत माध्यमांसमोर येऊन भाजप विरोधात बोलतायत हे आम्हला ही ऊर्जा देणारी बाब आहे. संजय राऊत यांचा आवाज पुरोगामी चळवळीचा आहे. मात्र राऊत यांचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जातोय. विश्वजित कदम यांच्यावर संशयास्पद बोलणे चुकीचे होते. निर्णय व्हायच्या आधी राऊत सांगलीत यायचे कारण काय?असा सवाल उपस्थित करत विशाल पाटील यांनी राऊतांच्या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली.