भर उन्हातही खरेदीसाठी लोकांची गर्दी…….

गेल्या ६० वर्षांची परंपरा असलेल्या विजापूर वेस येथील मीना बाजारात यंदाच्या वर्षीही खरेदीसाठी हिंदू-मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. विविध ड्रायफ्रूट्स, अत्तरे, कपडे यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे.चप्पलपासून कपड्यांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली असल्याने, भर उन्हातही महिला पुरुष ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.

रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, म्हणून दरवर्षी मीना बाजार भरविला जातो. बाराईमाम चौक, किडवाई चौक, बेगम पेठ या भागात हा बाजार भरतो. ईदच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या बाजारात ४५० ते ५०० स्टॉलधारक आहेत़. यामध्ये पायांतील चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश आहे.

संसारोपयोगी भांडी, खाद्यपदार्थ कमी किमतीत या ठिकाणी मिळतात. मीना बाजारात लातूर, उस्मानाबाद, विजापूर, पंढरपूर व स्थानिक व्यापाऱ्यांनी स्टॉल लावला आहे. योग्य किमतीत भरपूर खरेदी मीना बाजारात करता येते. खरेदीसाठी शहर व जिल्ह्यातून मोठी गर्दी केली होत आहे.