विशाल पाटील अडकले लोकसभेच्या चक्रव्यूहात….

सांगली लोकसभेच्या रणांगणात एकाकी पडलेल्या विशाल पाटील यांंच्या बंडखोरीचे सारथ्य काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम शेवटपर्यंत करणार का, वंचित, ओबीसी व स्वाभिमानीचा पाठिंबा मिळणार का, आघाडी धर्म पाळण्यासाठी ऐनवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी साथ सोडली, तर कार्यकर्ते पाठीशी राहणार का, पक्षाचा ए-बी फार्म न मिळाल्यास अपक्ष चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणार का, अशा विविध राजकीय प्रश्नांच्या चक्रव्यूहात विशाल पाटील अडकले आहेत.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. गतपंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर साधारण साडेतीन लाख मते त्यांनी मिळविली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून आपण सहज मैदान मारू या भ्रमात ते होते.

मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये सांगलीची जागा दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ऐनवेळी उद्धवसेनेत प्रवेश करून मिळविली. त्यानंतर विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे नेते व पदाधिकारी खडबडून जागे झाले.डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ते मुंबई व दिल्लीतील हायकमांडला भेटले. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या जागेवरील दावा सोडू नये म्हणून आक्रमक भूमिका घेतली. मात्र, या काळात मविआच्या पुलाखालून बरेच पाणी गेले. त्यामुळे सांगलीच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, या भूमिकेवर येऊन काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे विशाल पाटील लोकसभेच्या रणांगणात एकाकी पडले.