रामभक्तांमध्ये उत्साह सांगली झाली भगवी ..

भगवे ध्वज, भगव्या पताका लेवून अवधी सांगलीनगरी भगवी झाली आहे. रामभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. आजपासून पुढचा आठवडाभर सांगलीत प्रभू श्रीरामाची महती सांगणारे विविध कार्यक्रम आहेत.

रामभक्त आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी घरोघरी जाऊन अयोध्येतील अक्षतांचे वाटप केले आहे. सोमवारी, २२ जानेवारीला दिवाळीसारखा सण साजरा करण्याचे आवाहनही केले आहे. सांगली शहरामधील प्रत्येक चौक भगवे ध्वज, भगव्या पताका, प्रभू रामाच्या प्रतिमांनी सजले आहेत. टिळक चौक, गावभाग, राम मंदिर चौक, गणपती पेठ, बालाजी चौक, मास्ती रोड, रतनशीनगर, सराफ कट्टा, विश्रामबाग चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर भगव्या ध्वजांनी रंगला आहे. सांगलीसह उपनगरांमधूनही मोठा उत्साह आहे. अनेक अपार्टमेंटस् आणि घरांवर रामभक्तांनी भगवे ध्वज, पताका आणि रामाचे मोठमोठे डिजिटल्स लावले आहेत. विश्रामबागच्या स्त्री सखी महिला मंडळाने मंडळात श्रीराम व अक्षता कलशाची पूजा करून पाच रामरक्षेचे पाठ केले. मंडळापासून एसटी कॉलनीतील राममंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ महिला लेझीम खेळत व रामनामाचा गजर गजर करत सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रसाद वाटप झाले.