प्रकाश आवाडे यांचे बंड!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मुलाऐवजी स्वत:चीच उमेदवारी जाहीर करून भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी खळबळ उडवून दिली. त्यामागे लोकसभेची भीती दाखवून विधानसभेच्या उमेदवारीचा गुंता सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी कोल्हापुरात आहेत. त्यांना भेटीची वेळ दिली असताना त्यांनी त्याच्या आदल्या दिवशीच उमेदवारी जाहीर करून दबाव निर्माण केल्याचे सांगण्यात येते.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजीत भाजपचा कमिटेड मतदार आहे. त्यांचा पाठिंबा मिळवायचा तर हात चिन्ह चालणार नाही म्हणून त्यांनी ही चाल खेळली व त्यात ते यशस्वी झाले. निकालानंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता ते त्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. परंतु स्थानिक राजकारणात त्यांना अजून भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षसंघटनेत चंचूप्रवेश करू दिलेला नाही.इचलकरंजीत काही नसताना भाजप मी वाढवला आहे, विधानसभेला दोनवेळा जिंकलो आहे.

त्यामुळे २०२४ लाही या जागेवरून मीच लढणार असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आमदार आवाडे यांची कोंडी झाली आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेशही अजून झालेला नाही. त्यावरून लोकसभा निवडणुकीसाठी मुलगा राहुल यांचा भाजपकडून फारसा विचारही झाला नाही. त्यामुळे लोकसभेला डरकाळी फोडून त्यातून विधानसभेच्या निवडणुकीतील काही प्रश्न सोडवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.