रेठरे धरणला मोबाइलचा पँटच्या खिशातच स्फोट

रेठरे धरण रेठरे धरण (ता. वाळवा) येथे जगन्नाथ बबन पाटील या तरुणाच्या पँटच्या खिशामध्ये असलेल्या मोबाइलचा अचानक स्फोट झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत त्या तरुणाच्या पँटचा खिसा जळाला. मोबाइल गरम होत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान राखून मोबाइल खिशातून बाहेर काढून फेकून दिल्याने जगन्नाथ पाटील बचावले. ट्रक चालक म्हणून काम करणारे जगन्नाथ पाटील हा गुरुवारी सायंकाळी रेठरे धरण येथील पेट्रोल पंपावर टायरमध्ये हवा भरत होते.

त्यावेळी अचानक त्यांना खिशात ठेवलेला मोबाइल गरम झाल्याचे जाणवले. त्यांनी प्रसंगावधान राखून खिशातील मोबाइल बाहेर काढून फेकून दिला. यावेळी गरम झालेल्या मोबाइलचा अचानक स्फोट झाला. क्षणार्धात मोबाइल जळून खाक झाला. मोबाइलच्या अक्षरश: ठिकऱ्या झाल्या. मोबाइलचा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे समजू शकले नाही.