PBKS VS MI Head To Head : पंजाब-मुंबई यांच्यात काटे की टक्कर….

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुल्लानपूर, चंढीगड येथे होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल. पंजाब आणि मुंबई दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती ही सारखीच आहे. मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांनी या हंगामात प्रत्येकी 6 सामने खेळले आहेत.

पंजाब आणि मुंबईने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर दोघांनीही पराभवाचा चौकार लगावला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी उर्वरित सामने हे महत्त्वाचे असणार आहेत. पंजाब-मुंबई सामन्यानिमित्ताने उभयसंघांची एकमेकांविरुद्धची आकडेवारी कशी आहे, हे जाणून घेऊयात.पंजाब विरुद्ध मुंबई दोन्ही संघ एकूण 31 सामन्यात आमनेसामने आले आहेत. या 31 सामन्यात दोन्ही संघांची जवळपास तोडीसतोड कामगिरी राहिली आहे.

मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा 16 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर पंजाब किंग्सने 15 वेळा विजय मिळवला आहे. एका विजयाचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ लढाई झालेली आहे. तसेच 16 व्या मोसमात या दोन्ही संघांमध्ये 2 सामेन झाले होते. तेव्हाही दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला होता. त्यामुळे 18 तारखेला होणाऱ्या सामन्यात चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.