खासदार धैर्यशील मानेंचा सत्यजित पाटील सरूडकरांना टोला……..

महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. पण आमचा नेता हा आमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा आहे. आमचे ते कॅप्टन आहेत. तुमचे नेते तुमच्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत, त्याला काय करणार, असा टोला खासदार धैर्यशील माने यांनी नाव न घेता सत्यजित पाटील सरूडकर यांना कोल्हापुरात बोलताना लगावला. सत्यजित पाटील यांनी माने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन दोन दिवस यावे लागत असल्याची टीका केली होती. त्याला माने यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माने म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे केवळ कोल्हापूरमध्येच आले नाहीत तर ज्या ठिकाणी महायुतीचे त्यातही शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्या-त्या ठिकाणी ते अर्ज दाखल करायला जात आहेत. त्या-त्या ठिकाणी आपल्या शिलेदाराला पाठबळ देण्याची त्यांची भूमिका आहे. हिमालयाप्रमाणे ते आमच्या पाठीशी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांच्या पाठीशी ते आहेत. त्यामुळे वाळू कोणाच्या पायाखालची घसरली आहे हे येणारा काळच ठरवेल.