निवडणूक पथकाकडून साडेदहा लाखाची रोकड जप्त!

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. सांगलीवाडी ते इस्लामपूर या मार्गावरील टोलनाक्याजवळ निवडणूक पथकाने एका गाडीतून वाहतूक होणारी साडे दहा लाखांची रोकड पकडली. बुधवारी दुपारी सदरची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कार चालक जोतिबा फुलचंद गोरे याच्याकडे सदर रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. याबाबत अधिक माहिती अशी कि, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत.

या नाक्यावर २४ तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते. सांगलीवाडी येथे स्थिर सर्व्हेक्षण पथक क्रमांक तीनचे प्रमुख निखिल मांगोरे व आचार संहिता कक्ष प्रमुख विनायक झाडे, सहाय्यक पथक प्रमुख शंकर भंडारे, फोटोग्राफर प्रमोद अर्जुन भिसे तसेच पोलिस कर्मचारी निशांत मागाडे, विकी मोरे, वैशाली हटाळे यांचे पथक बुधवारी सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत होते. वाहनांची तपासणी सुरू असताना कार (क्र. एमएच ०९ डीएम १८९९) अडवून वाहनाची झडती घेतली असता, चालक जोतिबा फुलचंद गोरे यांच्या ताब्यात १० लाख ५१ हजार २० रुपये इतकी रोकड मिळून आली.

या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्र नसल्याने आढळले. रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही. त्यामुळे ही रोकड दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या व आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.