आता लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक तसेच नागरिकांची लगबग सुरु झाली असून कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होम, पार्टी हाऊसना राज्यातील अनेक पर्यटकांची पहिली पसंती असल्याचे दिसत आहे. नाताळच्या सुट्ट्यांसह शासकीय तसेच ३१ , डिसेंबर हा रविवारी आल्याने पर्यटकांच्या उत्साहात आणखीनच भरच पडली आहे.
शनिवार व रविवार असलेल्या सुट्टीमुळे नागरीक तसेच पर्यटक जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे, ऐतिहासिक ठिकाणी तसेच निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होमला पसंती दिली आहे. बाहेरगावच्या पर्यटकांनी कोल्हापूर शहरासह परिसरातील पन्हाळा, सादळे-मादळे, गगनबावडा, आंबा, राधानगरी, दाजीपूर, काळम्मावाडी परिसरातील हॉटेल तसेच रिसॉर्टमधील रुम्सचे बुकींग केले आहे. कोरोनापासून बहुसंख्य नागरिकांची पर्यटनवारी वाढली असून गेल्या दोन ते तीन वर्षात शहर तसेच परिसरात मोठमोठी हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होम, पार्टी हाऊस विकसित झाले आहेत.
कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यावर मोठमोठी हॉटेल्सची संख्या वाढली असून यामध्ये प्रामुख्याने तावडे हॉटेल ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता तर हॉटेल हब बनला आहे. तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल्सही पर्यटकांनी फुल्ल होत. याबरोबरच कोल्हापूर ते पन्हाळा, कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गारगोटी, कोल्हापूर ते कागल तसेच पुढे आजरा- गडहिंग्लज, तसेच राष्ट्रीय महामार्गावरही हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होमची मोठी रेलचेल आहे.
तसेच महामार्गावरील धाबे प्रवाशांनी बहरले आहेत. शहरालगतची हॉटेल पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत, तसेच शहरानजीकच्या निसर्गरम्य ठिकाणच्या हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे होमचेही बुकींग फुल्ल आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा तसेच कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून हे पर्यटक कोल्हापूरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा, नृसिंहवाडी, कणेरीमठ, खिद्रापूर, आदमापूर, गगनगिरी, विशाळगड, पन्हाळगड यासह शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, टाऊनहॉल, लक्ष्मीविलास पॅलेस, कळंबा तलाव, कात्यायनी येथेही पर्यटकांचा वावर वाढला आहे.
कोल्हापूरात पर्यटन, भाविकांची संख्या वाढली असल्याने शहरातील प्रमुख रस्ते तसेच चौक गर्दीने फुलून गेले आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुर हे भाविक आणि पर्यटकांनी फुलले आहे. भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. शनिवार, रविवार सुट्टी तसेच वर्ष अखेर आले आहे. यामुळे पर्यटनासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक सहकुटुंब कोल्हापुरात आले आहेत.