‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दिव्यांकाचा पती विवेक दहिया याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. दिव्यांकाच्या पीआर टीमनेही तिच्या अपघाताविषयी पोस्ट लिहिली आहे. काही तासांपूर्वीच दिव्यांकाचा अपघात झाला असून तिच्या हाताची दोन हाडं तुटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विवेकने दिव्यांकाच्या हाताचा एक्स-रेसुद्धा पोस्ट केला आहे.
ही पोस्ट पाहून चाहत्यांनी दिव्यांकाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून हा अपघात कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.विवेकच्या पीआर टीमने सोशल मीडियावर लिहिलं, ‘आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होतंय की विवेकचा उद्याचा लाइव्ह सेशन पुढे ढकलण्यात आला आहे. काही तासांपूर्वीच त्याची पत्नी दिव्यांकाचा अपघात झाला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिव्यांकाची काळजी घेण्यासाठी विवेक तिच्यासोबतच आहे.
या काळात तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.’ इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये दिव्यांकाच्या हाताचा एक्स-रे पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या हाताची दोन हाडं तुटल्याची दिसत आहेत. ‘दिव्यांका मॅमच्या हाताची दोन हाडं तुटली आहेत आणि उद्या तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. डॉक्टर तिची पूर्णपणे काळजी घेत आहेत’, असं त्यावर लिहिलं आहे.