इचलकरंजीत मैलायुक्त सांडपाण्याबाबत तक्रार

इचलकरंजी महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाच्या चेंबरमधून मैलायुक्त सांडपाणी बाहेर सोडण्यात येत आहे. याबाबतची तक्रार संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांसह शासनाच्या विविध विभागाकडे केली आहे.याबाबत मक्तेदारासह महापालिकेच्या अधिका-यांवर फौजदारी गुन्हा नोंद करावा व महापालिकेची बँक गॅरंटी जप्त करावी, असे तक्रारीत नमूद केले आहे.

यापूर्वीही एसटीपी प्रकल्पासह संपवेलमधून मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यामध्ये सोडले जाते. पुढे हे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते. याबाबत सातत्याने तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याबाबत कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. एसटीपी प्रकल्प सतत बंद असतो. मैलायुक्त सांडपाण्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रीया केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

मैलायुक्त पाणी व प्रक्रिया केलेल्या पाण्याची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. पाण्याच्या नियमित चाचण्या प्रयोग शाळेत केल्या जात नाहीत, असे हत्तीकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने मात्र या तक्रारीत कोणतेच तथ्य नसल्याचे सांगितले.