एक लाख रुपये देऊन लग्न पार पडले, अन् घरी आल्यानंतर सर्वजण गाढ झोपी गेले. नववधूने हीच संधी साधली अन दागिने घेऊन पसार झाली. याप्रकरणी लग्न जुळविणाऱ्या पूजा माने (वय ३२, रा. सांगली), नववधू नंदिनी राजू गायकवाड (रा. अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध जळगावच्या शनीपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. जळगावमधून पसार झाल्यानंतर याच तरुणीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी एका तरुणासोबत लग्न केल्याचे पुढे आले. तेथेही तिने अशीच फसवणूक केल्याचे जळगाव पोलिसांनी सांगितले.
जळगाव मधील मयूर चौधरी याच्या लग्नासाठी मुलीचा शोध सुरू असताना पूजा माने या महिलेचा फोन आला. एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगत मध्यस्थी केली. त्यासाठी दोनलाखांची मागणी केली. चौधरी यांनी लाखाची तयारी दर्शविली. त्यानुसार ६ मार्च रोजी तरसोद (जि. जळगाव) येथील मंदिरात लग्न झाले. यावेळी मुलीतर्फे पूजा माने, मावशी हजर होत्या. लग्नानंतर चौधरी यांनी पूजा मानेला लाख रुपये दिले.
लग्नाच्या मध्यरात्रीनंतर नववधू नंदिनी व तिची मैत्रीण पळून गेल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरुर येथे या महिलेने अन्य एका तरुणासोबत लग्न लावून दिल्याचे समजले. त्यामुळे चौधरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.