इचलकरंजीत अवजड वाहनांकडे वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष…..

इचलकरंजी शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग व्यवसाय आहे. वस्त्रोद्योगाबरोबरच इतर लहान मोठ्या उद्योगांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळे सहाजिकच शहर परिसरात तीन चाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. अनेक
चारचाकी, तीन चाकी वाहनधारक नियमापेक्षा ओव्हरलोड वाहतूक करताना दिसून येतात ही ओव्हरलोड केलेली वाहने छोट्या मोठ्या गल्लीतून फिरत असतात.

अनेक वेळा छोटे मोठे अपघातही घडले जातात. वस्त्रनगरी म्हणून परिचित असलेल्या इचलकरंजी शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून डंपर, ओव्हरलोड ट्रक, प्रमाणापेक्षा जास्त भरलेले वाहने आदि अवजड वाहनांची एक डोके दुखी बनली आहे. या अवजड वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामध्ये नाहक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अवजड वाहनांना ब्रेक कोण लावणार असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात असून या अवजड वाहनांच्या वाहतुकीकडे वाहतूक नियंत्रण शाखेचे सोयीस्करपणे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील वर्दळीच्या तसेच मुख्य रस्त्यावर येण्यास अवजड वाहनांना बंदी घालावी अथवा त्यांना ठराविक वेळेतच परवानगी द्यावी याबाबत वाहतूक शाखेने कडक भुमिका घेवून नियम मोडणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी तरच अवजड वाहनांचा प्रश्न निकाली लागेल असे बोलले जात आहे.