पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोल्हापूर दौरा कसा असेल?

उद्या सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर विमानतळावर पोहचतील. सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तपोवन याठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत. यानंतर सभा पार पडल्यानंतर सायंकाळी 6.20 वाजता तपोवन मैदानावरून कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होतील. त्यानंतर 6.30 वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. 

दरम्यान, अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. अधिकाऱ्यांनी विमानतळापासून तपोवनकडे पोहोचणारा मार्ग आणि तपोवन मैदानाची पाहणी केली आहे. काल गुरुवारीच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी आजपासून बंदोबस्त तैनात होणार आहे. सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतर नेते, कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी आणि सभेच्या येणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.