सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला; सेन्सेक्स 247 अंकांनी खाली

गुरुवारी (19 ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीची नोंद झाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह झाले. BSE सेन्सेक्स 247 अंकांनी घसरून 65,629 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 46 अंकांनी घसरून 19,624 वर आला. धातू, बँकिंग आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक विक्री नोंदवली गेली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर कंझ्युमर ड्युरेबल्स, मीडिया, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप शेअर्समध्ये घसरण झाली तर स्मॉल कॅप इंडेक्स तेजीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 33 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे नुकसान

आजही बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 320.91 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 321.39 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे 48,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले, तर गुरुवारी सोल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील आशियाई बाजार नकारात्मक व्यवहार करत होते. या नकारात्मक ट्रेंडचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील घसरणीच्या रूपात दिसून आला.