प्रत्येक साखर कारखान्याला मागील हंगामातील उसाला प्रती टन ४०० रूपये देणे शक्य आहे. परंतु, कागदोपत्री हिशोबात गोलमाल करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३७ साखर कारखानदारांनी गतवर्षीच्या गळीत हंगामातील १२०० कोटी हाणले आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ४०० रुपये घेऊन १५ लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे. यासाठीच हा आमचा संघर्षयज्ञ आहे, असे प्रतिपादनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
गोरंबे (ता. कागल) येथे आयोजित केलेल्या आक्रोश पदयात्रेतील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला बाबूराव ढोले होत्या. शेट्टी म्हणाले, ‘कारखान्यांची हिशोबपत्रके अभ्यासूनच आम्ही ४०० रूपये घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे प्रत्येक साखर कारखान्यांनी ते द्यावेत. अन्यथा संघटना उसाचे एक कांडेही तोडू देणार नाही.