राज्य मंत्रिमडळात समावेश झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर आज प्रथमच कोल्हापुरात आले आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी प्रथम श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दहाही जागांवर महायुतीला यश मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यातून मंत्रिपदाची चुरस वाढली होती. मंत्रिपद कोणाला मिळणार याबद्दल समर्थकांमध्ये पैजाही लागल्या होत्या.
सलग सहावेळा विजयी झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आणि सलग तीनवेळा विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्री म्हणून मुश्रीफ व आबिटकर यांनी शपथ घेताच दुसऱ्या दिवसापासून नागपूरला विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. हे अधिवेशन संपवून दोन्ही मंत्री आज कोल्हापुरात आले आहेत. छत्रपती ताराराणी महाराज पुतळा कावळा नाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.