करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीनिमित्त रविवारी (ता. २२) नगरप्रदक्षिणा सोहळा सजणार आहे. त्याची तयारी आता मंदिर परिसरात सुरू झाली आहे. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे देवीच्या स्वागतासाठी पंचवीस फुटी देवीचे मुखकमल साकारणार आहे.
गुजरी कॉर्नर येथे प्रसिद्ध नृत्यांगना वैष्णवी पाटील आणि सहकलाकारांचा ‘जागर आई अंबाबाईचा’ हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, श्री अंबाबाईची आज मोहिनी रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दिवसभरात अडीच लाखांहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. रात्री पारंपरिक उत्साहात पालखी सोहळा सजला. कलशाच्या आकारात पालखी सजवण्यात आली. खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते पालखीपूजन झाले.
श्री अंबाबाई मोहिनीरुपिणी माता
देव आणि दैत्यांनी केलेल्या समुद्र मंथनातून दुर्लभ अशी चौदा रत्ने प्रगट झाली. त्यामध्ये धन्वंतरी अमृत कलश हातात घेऊन प्रकट झाले. हा अमृत कलश दैत्य बळजबरीने काढून घेऊ लागले. या अमृत प्राशनाने अधार्मिक, अन्यायी, क्रूर राक्षस अमर होतील व सर्वांना त्रासदायक होतील, अशी देवगणांना चिंता वाटू लागली. सर्व देवता श्री विष्णूंना शरण गेले. या वेळी भगवान विष्णूने श्रीललिता देवीची आराधना करून मातेचे रूप प्रगट केले. तोच मोहिनी अवतार होय. त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी सज्ज, सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करणारी अशा मोहिनी स्वरूपाचे दर्शन घडवणारी पूजा आज बांधण्यात आली.
सहा हजारावर भाविकांनी घेतला मोफत बससेवेचा लाभ
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे काल ललिता पंचमीच्या सोहळ्यासाठी बिंदू चौक ते टेंबलाई टेकडी मोफत बससेवा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी सहा ते रात्री ११ या वेळेत ९० फेऱ्यांच्या माध्यमातून सुमारे सहा हजारांहून अधिक भाविकांनी या बस सेवेचा लाभ घेतला. अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते उपक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी ‘केएमटी’चे निरीक्षक नितीन पोवार, राजू सुगंधी, तन्मय मेवेकरी, प्रतीक गुरव, उत्तम पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांचे सहकार्य मिळाले.
‘मनसे’च्या अन्नछत्राला प्रतिसाद
श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोज दुपारी बारा वाजता भवानी मंडप परिसरात मोफत अन्नछत्र उपक्रम सुरू आहे. सलग सातव्या वर्षी हा उपक्रम होत असून हजारो भाविक त्याचा लाभ घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी सांगितले. संयोगिताराजे छत्रपती, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस निरीक्षक सतीश गुरव, सागर पाटील, उद्योजक मोहन मुल्हेरकर, शंकर पाटील आदींनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.