रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकत्रित 3 हजार चा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यास दोन दिवसापासून सुरुवात केली आहे. राज्य सरकारची बहुचर्चित योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये बँकांमध्ये जमा होऊ लागल्याने हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकांच्या शाखा मध्ये गर्दी होत असल्याचे चित्र शुक्रवारी बँकांच्या शाखा- शाखा मध्ये दिसून येत आहे.
सोमवारी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्यापूर्वी दोन दिवस बँकांना सुट्टी असल्याने महिलांनी पैसे काढण्यासाठी आज शुक्रवारी बँकेत गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. खात्यावर पैसे जमा झालेला मेसेज मिळेल तसे महिलांची पावले बँक शाखेकडे वळत आहे. राज्यातील 21 वर्षे वयावरील आणि 65 वर्षे वयाच्या आतील लाभार्थी महिलांना मासिक पंधराशे रुपये अनुदान देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अल्पावधीत लोकप्रिय आणि बहुचर्चित ठरलेली योजना महायुतीच्या राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार की निवडणुकीनंतर बंद होणार याबाबतच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. ही योजना कायमस्वरूपी सुरू होणार असल्याचा दावा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच केला आहे. तर अर्थमंत्र्यांचाच वित्त विभाग या योजनेवर खर्च होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या निधीसाठी अनुकूल नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल असेही बोलले जात आहे.
या योजनेची भवितव्य काही असू दे, मात्र आता मिळालेल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणी बँकेत गर्दी करत आहेत. राधानगरी तालुक्यात सध्या केवळ राष्ट्रीयकृत बँका आणि शेड्युल बँकांच्या शाखा मध्ये अनुदान जमा झाले असून अद्याप के डी सी सी बँक मध्ये पैसे जमा झालेले नाहीत.