इचलकरंजी येथे १८ जानेवारीला ताराराणीच्या जीवनावरील चित्ररथ फिरणार

कोल्हापूर जिल्हा हा अनेक कारणांनी म्हणजेच अंबाबाई मंदिर, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी पायताण तसेच पन्हाळा किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहेच. अनेक कार्यक्रम या जिल्ह्यात अगदी उत्साहात साजरे केले जातात. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असतो. महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सर्वांचा एक भाग म्हणून महाराणी ताराबाई यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आली असून हा चित्ररथ मंगळवारी कोल्हापूर शहरात होता.

बुधवारी पन्हाळा येथे तर गुरूवारपासून तो वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार आहे. किल्ल्याचे स्वरुप असलेला भव्य चित्ररथ, त्यावर महाराणी ताराराणी यांचा भव्य आश्वारुढ पुतळा, राज दरबार तसेच महाराणी ताराराणी यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण या चित्ररथाच्या माध्यमातून घडते. हा चित्ररथ कोल्हापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील प्रतिसादानंतर बुधवारी पन्हाळा येथे होता तर १६ रोजी वारणा, १७ ला कागल व १८ ला इचलकरंजी येथे हा चित्ररथ फिरणार आहे.

 
कोल्हापूर शहरात शाहू महाराज समाधी स्थळ ते दसरा चौक या परिसरात चित्ररथ फिरविण्यात आला. दसरा चौक परिसरात रथ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शाहीर दिलीप सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराणी ताराराणी यांच्यावरील विविध पोवाडे सादर केले. यावेळी नागरिकांनी रथाच्या संकल्पनेबद्दल माहिती घेतली. दसरा चौकनंतर तोरस्कर चौक, महाद्वार रोड, गंगावेश येथे चित्ररथ फिरविण्यात आला. गंगावेश येथेही शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले.