23 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा आहेत त्या मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे आहे. राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात या निवडणुकीत भाजपाला दोन जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला तीन, राष्ट्रवादीला एक, जनसुराज्य दोन आणि चंदगडचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील त्याचप्रमाणे शिरोळचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर असे दोन अपक्ष आमदार आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. तर प्रकाश आबिटकर हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. तसंच राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विनायक कोरे हे सलग दोन वेळा आमदार म्हणून विजयी झालेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आमदार प्रकाश आबिटकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील मंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
तर आमदार हसन मुश्रीफ हे सलग सहा वेळा निवडून आल्याने राष्ट्रवादीकडून त्यांचं मंत्रीपद हे निश्चित मानले जात आहे. कोल्हापुरातून शिवसेना व भाजपकडून मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागणार याविषयी उत्सुकता आहे.
