हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसात गुंडाळणार?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. नागपूर येथे हे अधिवेशेन होणार आहे.

7 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे 20 डिसेंबर पर्यंतचे कामकाज दिनदर्शिकेत नमूद करण्यात आले आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवस कामकाज होणार असून त्या पुढे कामकाज चालणार आहे की अधिवेशन 20 डिसेंबरला गुंडाळलं जाणार आहे, हे विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते मात्र या वर्षी तो 20 डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अधिवेशनात मराठा आरक्षण, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करणार आहेत. राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, तसेच नुकसान भरपाईबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहेत.