कंत्राटी भरतीवरुन राजकारण तापलं!

राज्य सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावरुन राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेण्याची घोषणा तर केलीच, त्याचबरोबर कंत्राट भरतीचा निर्णय हा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा असल्याचा आरोपही केला. तसेच युवकांची दिशाभूल केल्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागण्याचीही मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कंत्राटी भरतीवरुन लाखो तरुणांची दिशाभूल केल्याप्रकरणी शरद पवार, उद्धव ठाकरेंनी नाक घासुन माफी मागावी.. अशी मागणी करत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध भागात महाविकास आघाडीविरोधात निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत.

कोल्हापुरात निषेध मोर्चा…

कंत्राटी भरतीचे महापाप महाविकास आघाडी, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारचे असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. या विरोधात आज कोल्हापुरातील बिंदू चौकात भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पुण्यातही भाजपने महाविकास आघाडीविरोधात “माफी मागो आंदोलन” केले. पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

अकोल्यात भाजपचे पुतळा दहन आंदोलन….

अकोल्यातही भाजपने महाविकास आघाडीविरोधात आंदोलन केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी याकरिता भाजपाने पुतळा दहन व उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला.