RCB vs GT : फाफचं अर्धशतक, विराटचा तडाखा, आरसीबीचा 4 विकेट्सने विजय!

रॉयल चॅलेंजर्स बंगळरुने आयपीएलच्या 17 व्या मोसमात विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने आरसीबीला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 13.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

आरसीबीने 152 धावा केल्या. आरसीबीने या विजयासह प्लेऑफमधील जरतरचं आव्हान कायम राखण्यात यश मिळवलंय. तर दुसऱ्या बाजूला गुजरातचं पराभवामुळे प्लेऑफच्या हिशोबाने टेन्शन वाढलंय.फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली या आजी माजी कर्णधारांनी आरसीबीला जोरदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी तडाखेदार आणि विस्फोटक बॅटिंग केली. फाफने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी 92 धावांची भागीदारी केली.

फाफ 23 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 सिक्ससह 64 धावांची खेळी केली. फाफनंतर आरसीबीची घसरगुंडी झाली.आरसीबीने अवघ्या 25 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावल्या. विल जॅक्स 1, रजत पाटीदार 2, ग्लेन मॅक्सवेल 4 आणि कॅमरुन ग्रीन 1 आणि विराट कोहली 42 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्निल सिंह या जोडीने आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं. दिनेश कार्तिकने 12 बॉलमध्ये नाबाद 21 धावा केल्या. तर स्वप्नील सिंह याने 15 धावांचं योगदान दिलं. गुजरातकडून एकट्या जोशुआ लिटीलने 4 आणि नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या.