इचलकरंजीत दिवाणजीवर खुनी हल्ला! गुन्हेगारांकडून कोयत्याने वार

क्रिकेटच्या जुन्या वादातून दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पाठलाग करून एका दिवाणजीवर कोयत्याने सपासप वार केले. सूरज अशोककुमार राठी (वय ३२, रा.नारायण पेठ इचलकरंजी) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी प्रणव माणकर, समर्थ राजकुमार जाधव (दोघे रा. इचलकरंजी) या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिजामाता मार्केट येथील एका पेढीत घडली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सूरज राठी हा एका कापड पेढीवर दिवाणजी म्हणून कामाला आहे. काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो कामावर आला. पेढीचे शटर उघडत असतानाच अचानक पाठीमागून दोघांनी कोयत्याने हल्ला सुरू केला.

प्रणव माणकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याला खाली पाडले. त्यांनतर समर्थ जाधव याने हातातील कोयत्याने राठी याच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर माणकर याने जाधव याच्या हातातून कोयता काढून घेऊन पुन्हा त्याच्या हातावर व खांद्यावर गंभीर वार केले.

दोघांनी राठी याला पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तुला आम्ही संपवतो, अशी धमकी दिली. अंगावर सुमारे चार ठिकाणी गंभीर वार झाल्याने जखमी अवस्थेत राठी भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

हल्ल्यानंतर दोघे कोयता टाकून पसार झाले. शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक ऊर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांना घड्याळ, अंगठी, कानातील बाली आढळून आली.

तसेच कोयताही मिळून आला. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे आदींनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.