इचलकरंजीतील पोलिस सदनिकेचे काम अंतिम टप्प्यात

इचलकरंजी येथील कलानगर आवारात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करून सदनिका उभारण्यात येत आहे. ९५ फ्लॅटचे दोन भव्य टॉवर, अधिकारी वर्गासाठी वेगळे अपार्टमेंट, बंगलो बांधण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून पुढील एक-दोन महिन्यात काम पूर्ण होईल. वस्त्रनगरीतील विविध देखण्या वास्तूमध्ये पोलिस क्वॉटर्सचा समावेश असेल. शहरात अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालय, डीवायएसपी कार्यालयासह गावभाग, शिवाजीनगर व शहापूर पोलिस स्टेशन कार्यरत आहे. त्यामुळे शहर परिसरात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरातील थोरात चौकात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सदनिका आहेत परंतु त्या कमी पडत आहेत.  

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांची वाढती संख्या पाहता येथील कलानगर परिसरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सदनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर महाराष्ट्र पोलिस हौसिंग कार्पोरेशनच्यावतीने सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. पुणे अर्किटेक सोमानी असोसिएटस् सांगलीच्या देखरेखीखाली व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार जानेवारी २०२२ मध्ये बांधकामाला सुरूवात केली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पोलिस सदनिकेमध्ये एक हॉल, दोन बेडरूम, दोन बाथरूम, किचनचा समावेश आहे. अतिशय भव्य आणि दिव्य बांधण्यात आलेल्या या टॉवरमुळे इचलकरंजीच्या वैभवात निश्चितच भर पडेल.