मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली होती. ही घटना घडल्याच्या ४० तासांनंतर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग लागली आहे.बुधवारी सकाळी आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप होती. परंतु दहा मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले.
आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान घाटकोपर होर्डिंग्ज खालून आज सकाळी अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत. त्यांची नावे अजून समजलेली नाहीत. यामुळे मृतांचा १८ वर जाण्याची शक्यता आहे. राजावाडी रुग्णालयातील प्रकाश वाणी यांनी ही माहिती दिली.घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला आता ४० तास झाले आहेत. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकले आहेत.
त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे. पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे. परंतु बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली. मोठे लोखंड कटरने कापात असताना आग लागली. आगीची घटना घडताच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली. या ठिकाणी त्वरित अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्याचे काम सुरु आहे.