पवार काका-पुतण्यांमधील अंतर आणखी वाढलं..

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आज पहिल्यांदाच एकत्र आले. दौंडमधील स्वामी चिंचोलीत अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचं उद्घाटन आज शरद पवारांच्या हस्ते झाले. राजकीय संघर्षानंतर पवार काका-पुतणे एकत्र येत असल्यानं या कार्यक्रमाची उत्सूकता होती. मात्र यावेळी दोघांमध्ये अजिबातच संवाद झाला नाही. अजितदादा शरद पवारांपासून अंतर राखून होते. शरद पवार फीत कापत असतानाही अजितदादा थोडे मागेच उभे होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार, आशा पवार असे सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते. 

शरद पवार आणि अजित पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातले बहुचर्चित काका-पुतणे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच ते दोघेही जाहीरपणे एकत्र आले. निमित्त होतं दौंडमधील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीच्या उद्घाटनाचं.

अजित पवारांच्या वडिलांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या या स्कूलचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते 

अजित पवारांच्या वडिलांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या या स्कूलचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते झालं. राजकीय संघर्षानंतर पहिल्यांदाच पवार काका-पुतणे एकत्र येत असल्यानं कार्यक्रमाची उत्सूकता होती. दोघेही एकत्र आले, त्यांनी एकमेकांना पाहिलं, मात्र त्यांच्यात अजिबातच संवाद झाला नाही.

अजितदादा शरद पवारांपासून अंतर राखूनच

पहिल्यापासूनच अजितदादा शरद पवारांपासून अंतर राखूनच होते. अगदी शरद पवार फीत कापत असतानाही अजितदादा मागेमागेच राहत होते. ते पुढं आल्यानंतर पवारांनी फीत कापली. नामफलक सोहळ्याच्या उद्घाटनाला दोघे दोन बाजूंना उभे होते. त्यावेळी काहीच बोलणं झालं नाही.

स्टेजवर रंगला  ‘किस्सा कुर्सी का’ 

स्टेजवर वेगळाच ‘किस्सा कुर्सी का’ रंगला.. स्टेजवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये प्रतिभाताई पवारांची खुर्ची होती. मात्र, अजित पवारांनी आपल्या नावाचा स्टीकर खुर्चीवरून हळुच काढून टाकला आणि त्याठिकाणी आपल्या आई आशाताई पवार यांना बसवलं. त्यामुळं पवार काका-पुतण्यांमधील अंतर आणखी वाढलं. इथंही दोघांमध्येही अजिबातच संवाद झाला नाही.  दौंडमधल्या शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अख्खं पवार कुटुंब एकत्र आलं. मात्र, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये किती दुरावा आहे, याचं चित्र पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला दिसला.