सोलापूर विमानतळाच्या सुरक्षविषयीक पुन्हा तपासणी सुरू…..

होटगी रोड येथील विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेची नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून मंगळवारपासून तपासणी सुरू आहे.बुधवारी त्यांनी विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध बाबींची अत्यंत बारकाईने तपासणी केली. त्यात त्यांना काही त्रुटी आढळल्या असून त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना विमानतळ प्राधिकरणाला दिल्या आहेत.नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली.

यावेळी सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांना विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही किरकोळ बाबी राहिलेल्या असल्याचे आढळले. त्यांनी त्याची पूर्तता करण्याबाबत निर्देश दिले. बुधवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही विमानतळाची पाहणी केली. त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध बाबींवर चर्चा केली. येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन व विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची त्यांना माहिती दिली.

यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोथ यांच्यासह महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून विमानतळाच्या सुरक्षाविषयक बाबींची तपासणी होईल. त्यानंतर डीसीएएसचे अधिकारी विमानतळाला भेट देऊन त्याबाबतची पाहणी करतील. त्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यावर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.