बगीचे हाऊसफुल्ल, सोयीसुविधांचा उपलब्ध नाहीत…

इचलकरंजीत सध्या शाळांना सुट्ट्या पडल्याने शहरातील बगीचे गर्दीने फुलून गेल्याचे दिसून येत आहेत. मात्र, अनेक बागांमध्ये सोयीसुविधांचा वानवा, मोडलेली खेळणी, लहान मुलांची मोठी गर्दी यामुळे अनेकजणांचा हिरमोड होताना दिसून येत आहे. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ विविध लहान मोठ्या बागीचांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर बालगोपालांसाठी विविध खेळण्यांची सुविधा करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.अबालवृध्दांसाठी विरूंगुळा व्हावा तसेच बालगोपालांसाठी खेळण्यांची सुविधा उपलब्ध करून त्यांना आनंद घेता यावा. शहरात राणी बाग, सुंदर बाग, शहीद भगतसिंग उद्यान या मोठ्या बगीचांबरोबर विविध भागांमध्ये लहान-लहान उद्यानांची सोय केली आहे.

मात्र त्यातील बहुसंख्य अनेक लहान उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानांमध्ये असलेले ओपन जीम, खेळणी व इतर साहित्यांची मोडतोड झाली आहे .तर अनेक उद्याने तळीरामांचा अड्डा बनली आहेत. त्यामुळे सायंकाळ नंतर महिलांना बगीच्यामध्ये जाणे मुश्किलीचे बनले आहे. अनेक बगीचांमध्ये देखरेखीसाठी वॉचमनच नसल्याने सदरचे उद्याने ‘आव – जाव घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे. तर गर्दी होणाऱ्या सुंदर बागेमध्ये तर सायंकाळनंतर मोठी खवैय्यांची गर्दी असते त्याचबरोबर खेळण्याबागडण्यासाठी येणारी मुले तसेच फिरण्यासाठी येणारे वृध्दांसाठी संख्याही मोठी असते. त्यामुळे अनेकवेळा या बागेमध्ये बसण्यासाठी सुध्दा जागे नसते. तसेच शहीद भगतसिंग उद्यानामध्ये लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, बोटींगची सुविधा उपलब्ध करून द्यावी .सुट्ट्यांमुळे शहरातील बागा सायंकाळनंतर गजबजलेल्या दिसून येत असतात.

शहरातील अनेक लहान उद्यानांमध्ये वॉचमन नसल्याने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तसेच अनेक बागेतील खेळण्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. तेव्हा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी विविध बागेमध्ये पाहणी करून बगीचांना गतवैभव प्राप्त करून द्यावे सुरक्षेसाठी कर्मचारी नसल्याने बोटींग बंद करण्यात आली आहे. या उद्यानात सायंकाळनंतर मोठी गर्दी दिसून येते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राणी बागेतसुध्दा मोठी गर्दी असते. या सर्व मोठ्या बागांमध्ये सोयीसुविधांचा वानवा दिसून येते. तर अनेक खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होताना दिसून येत आहे.