इचलकरंजीत बनावट सोने तारण प्रकरणात चौघांना पोलिस कोठडी!

डॉ. अण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप. बँकेच्या इचलकरंजी शाखेत बनावट सोने तारण ठेवत ७ लाख ५८ हजार ९०० रुपयांची फसवणूक प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात एकूण पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शिवबाबू पन्नालाल गुप्ता (रा. कोल्हापूर नाका) व सराफ दत्तात्रय देवकर (रा. वृंदावन अपार्टमेंट, चांदणी चौक), महेश मारुती कांबळे (वय ३२, उचगाव) आणि धनाजी राजाराम खुडे (३१, रा. रूकडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे, तर सौ. राणी शिवबाबू गुप्ता फरारी आहे. याप्रकरणी विशाल बाळासो नायकवडी (रा. पेठवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
डॉ. अण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप. बँक शाखेत शिवबाबू गुप्ता व राणी गुप्ता यांनी बनावट दागिने खरे असल्याचे सांगत बँकेकडून कर्ज घेतले. यामध्ये सराफ दत्तात्रय देवकर यांनी दागिने खरे असल्याचा दाखला दिला होता. मात्र, ही बाब बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर बँकेने वरील तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तपासात यामध्ये आणखी दोघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी धनाजी खुडे व महेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी संगनमताने बँकेची फसवणूक केली आहे. कांबळे याने बनावट दागिने खुडे याच्याकडे दिले. तर खुडे याने ते गुप्ता यांच्याकडे सोपवत सराफ देवकर याच्या मदतीने खरे असल्याचा दाखल घेत बँकेत ठेवून कर्ज घेतले. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.