मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी मिळेना उमेदवारी पक्षाची तक्रार…

लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन ११ दिवसांचा कालावधी उलटला तरी उमेदवार व पक्षांनी मागणी करूनही केंद्रनिहाय किती मतदान झाले, याची माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही. फक्त कोल्हापुरातच नव्हे तर मतदान झालेल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांत ही स्थिती आहे.लोकसभेच्या जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान झाले. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्या त्या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले, त्यात महिला, पुरुष मतदारांची संख्या किती ही माहिती जाहीर करण्यात आली; पण केंद्रनिहाय किती मतदान झाले, याची आकडेवारी जाहीर झालेली नाही. केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची माहिती मिळावी म्हणून उमेदवार आणि पक्षांनी त्या-त्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत; पण अजूनही ही माहिती मिळाली नसल्याची तक्रार आहे.

पूर्वी मतपत्रिकेद्वारे मतदान होत होते. त्यावेळी प्रत्येक केंद्रनिहाय मतमोजणी न करता सुरुवातीला सर्व मतपत्रिका एकत्रित करून प्रत्येकी २५ मतपत्रिकेंचे गठ्ठे करून त्याची मतमोजणी केली जात होती. केंद्रनिहाय मतमोजणी झाली तर कोणत्या गावांत कोणाला किती मते पडली, ही बाब उघड होत होती. त्यातून त्या गावांवर निवडून येणाऱ्या प्रतिनिधींकडून अन्याय होण्याची शक्यता गृहित धरून मतपत्रिका एकत्रित करून त्या मोजल्या जात होत्या. आता मतदान यंत्राद्वारे मतदान होत आहे.

त्यामुळे प्रत्येक केंद्रावरील यंत्रात कोणाला किती मते मिळाली, हे जाहीर होत होते. यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ज्या दिवशी मतदान होईल, त्यानंतर एक-दोन दिवसांतच केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रसिध्द केली जात होती. निवडणुकीच्या निकालानंतरही केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची माहिती प्रसार माध्यमांनीही दिली जात होती; पण यावेळची निवडणूक त्याला अपवाद ठरत आहे.
लोकसभेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात काही जिल्ह्यांत किंवा राज्यात मतदानाची टक्केवारी वाढल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. हा प्रकार ताजा असतानाच उमेदवार व पक्षांनी मागणी करूनही केंद्रनिहाय आकडेवारी का दिली जात नाही, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.