आष्ट्यात बेघरांना घरकुल बांधून द्यावी यासाठी आंदोलन…

आष्टा स्वतःची जागा नसणाऱ्या, भाड्याच्या घरात व झोपडपट्टीत राहणाऱ्या बेघर गोरगरिब महिला, शेतमजूर व भूमिहीन नागरिकांना पालिकेने घरकुल बांधून द्यावीत. या मागणीसाठी सोमवार, दि. २७ मे रोजी पालिकेसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली. याबाबत नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या मालकीची सर्व्हे क्रमांक ३६८ (नवीन नंबर ३४ / २२९) मधील सहा एकर सहा गुंठे जमीन शहराचा विकास आराखड्यात पंतप्रधान आवास योजना व भूमीहिन बेघर नागरिकांना घरकुलासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे.

आष्टा पालिका प्रशासनाकडे सुमारे पाचशे नागरिकांनी रितसर अर्ज दाखल केले आहेत. आचारसंहितेचे कारण सांगून प्रशासन चालढकल करीत आहे. यापूर्वी ही जागा गॅस प्रकल्पासाठी हस्तांतरीत झाली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर ही जागा पालिकेकडे घरकूल बांधण्यासाठी हस्तांतर झाली आहे. अटी व शर्तीचा भंग झाल्यास ही जागा परत शासनाकडे हस्तांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजता पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.