सोलापुरातील विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येणार….

सोलापुकरांसाठी अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली होटगी रोड विमानतळावरील विमानसेवा सुरू होण्यासाठी आता एक एक टप्पा पूर्ण होत आहे. या विमानतळाच्या धावपट्टीचे, संरक्षक भिंतींचे व प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
ही सर्व कामे १० जुलैपर्यंत पूर्ण होतील. तत्पूर्वी विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेला परवाना मिळविण्यासाठी १५ जूनच्या आसपास नागरी विमान वाहतूक महासंचलनालय (डीजीसीए) यांच्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, विमानसेवेच्या परवान्यासाठी सोलापुरातून प्रस्ताव गेल्यानंतर डीजीसीएचे पथक होटगी रोड विमानतळावर येऊन विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. या पाहणीत त्यांना ज्या काही त्रुटी आढळतील, त्या त्रुटी दुरुस्त करण्याची सूचना केली जाईल.या त्रुटींची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा अंतिम पाहणी व विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेला परवाना दिला जाईल. त्रुटीची दुरुस्ती व अंतिम पाहणी यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असते. सोलापूरकरांची विमानसेवेची गरज पाहता हा कालावधी कमी करावा, लवकरात लवकर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.