महाविकास आघाडीतील जागावाटप रखडलेले असताना सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील धुसफूस समोर आली. सांगलीच्या जागेवर आघाडीतील दोन्ही पक्षांनी दावा केल्याने जागावाटपाचा पेच कायम असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीला काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील नेते विश्वजित कदम यांनी आक्षेप घेतला आहे.
सांगलीमधून विशाल पाटील हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे सांगलीवरून महायुतीतील मतभेद समोर आले आहेत.दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला आहे.
त्याबदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा घेतली आहे, असे सांगत येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन जागावाटपासंदर्भात घोषणा केली जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.