डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा स्फोट!

 डोंबिवलीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र डोंबिवली एमआयडीसीपासून लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जात आहे. एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते. 

प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील अमुदान या कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. 

याठिकाणी अजूनही स्फोट सुरु असल्याचेही समजते. त्यामुळे ही आग आणखी दूरवर पसरण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या एमआयडीसीच्या आजुबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्याने पडझड झाल्याचे दिसत आहे.